राजापूरचे नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पालिकेच्या बैठकीमध्ये रत्नागिरीमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता असून प्रकल्प उभारणीचे समर्थन करणारा ठराव मंगळवारी संमत करण्यात आला. या बैठकीमध्ये ११ विरुद्ध ५ या मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला.
राजापूर शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासह भविष्यात दर्जेदार आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा सामाजिक आणि आर्थिक विकास, रोजगार निर्मितीसाठी ग्रीन रिफायनरीसारख्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असल्याची भूमिका अॅड. खलिफे यांनी मांडली. रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबत या ठरावाच्या वेळी विरोधी भूमिकेत असलेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी प्रतीक्षा खडपे आणि मनीषा मराठे यांनी प्रकल्प उभारणी समर्थनाच्या बाजूने मत नोंदवले आहे. मनीषा मराठे यांनी फोन करून आपण प्रकल्पाच्या उभारणीच्या ठरावाचे समर्थन करत असल्याची माहिती दिल्याचे नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी सांगितले.
रत्नागिरी ग्रीन रिफायनरी कंपनीने कोरोनाच्या महामारीमध्ये तालुकावासीयांसाठी अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीबाबत चर्चा सुरु असताना शिवसेनेचे विरोधी गटनेते विनय गुरव यांनी, शिवसेना पक्षाची जी भूमिका आहे, तीच आपली भूमिका असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी प्रकल्पाला समर्थन नसल्याची भूमिका मांडली. वैयक्तिक स्वरूपात कोणाला पाठिंबा द्यावयाचा असेल तर आपली काहीच हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उपसूचनेला शिवसेनेचे नगरसेवक सौरभ खडपे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे एकूण अकरा जणांची सकारात्मक मते मिळाल्याने ठराव मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी दिली.