जिल्ह्यातील संगमेश्वर आणि खेड येथील रास्त धान्य दुकानांमध्ये प्लास्टिक सदृश्य तांदुळ सापडल्याचा दावा केला जात आहे. यामुळे पुरवठा यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी हे तांदुळ जप्त करून तपासणीसाठी त्याचे नमुने पाठविण्यात आले आहेत. तांदळाच्या गोणीमध्ये काही प्रमाणात फोर्टीफाईड तांदुळ असतो. त्यामुळे सापडलेला हा तांदुळ प्लॅस्टिकचा आहे की फोर्टीफाईड तांदूळ आहे, याची खातरजमा केली जाणार आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याम धील रास्त धान्य दुकान कडवई नं. ३ या दुकानामधून वितरीत करणेत आलेल्या तांदुळात प्लास्टिक तांदूळ आढळून आले. याबाबत सोशल मिडियावर बातमी प्रसिध्द झाली होती. त्यानुसार सदर रास्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना वितरित केलेल्या धान्याची लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचेमार्फत चौकशी केली. त्यात प्लॅस्टिकसदृष्य तांदुळ आढळून आला नाही, असे तहसीलदार संगमेश्वर यांनी पुरवठा विभागाला कळविले आहे. मात्र संबंधीत ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे तांदुळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
खेड तालुक्यातही काही प्रमाणात प्लास्टिक सदृष्य तांदुळ सापडला. तोही ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवला आहे. तांदळाची पाच पॅकेट ताब्यात घेतली आहेत. तांदुळाच्या नमुन्यांची तपासणी करुन त्यामध्ये प्लास्टिक तांदूळ आहे किंवा कसे? तसेच सदर तांदुळामध्ये फोर्टीफाईड तांदूळ आहे किंवा कसे? याबाबत तपासणी करुन आपला अहवाल त्वरित या कार्यालयास पाठविण्यात यावा, असे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने दिले आहे. तांदळाच्या गोणीमध्ये काही प्रमाणात फोर्टीफाईड तांदुळ असतो. त्यातला हा प्रकार आहे की काय याचीही खात्री केली जाणार आहे. पुरवठा विभागाने त्या तांदळाचा भातही करून पाहिला मात्र हे तांदुळ पाण्यावर तरंगतात. त्याची पेज निघत नाही. परंतु त्याचा चिकट भात होते, असे पुरवठा विभागाचे निरीक्षण आहे.