रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यास उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू असताना आता यात ना. रवींद्र चव्हाण यांचेही नाव पुढे आले आहे. यासाठीच त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात विजयी संकल्प मेळावे घेतले जात असल्याचा अंदाजही बांधला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. या आधीही भाजप नेत्यांनी या मतदार संघावर दावा केला आहे. नुकताच जिल्ह्यात दोन ठिकाणी विजयी संकल्प मेळावा पार पडला. यामध्ये ‘अगली बार चारशे पार’चा नारा देण्यात आला. यात रत्नागिरी मतदार संघाचाही उल्लेख ना. रवींद्र चव्हाण यांनी केला.

युतीच्या जागा वाटपात रत्नागिरीची जागा कोणाला देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पालकमंत्री उदय सामंत यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील असे म्हटले होते. तर भाजपकडूनही यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्याचे पहायला मिळत आहे. एकूणच भाजपच्या हालचाली आणि विजयी संकल्प मेळाव्याचा आवाका लक्षात घेता आता ना. रवींद्र चव्हाण हेच युतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. रवींद्र चव्हाण हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. सिंधुदुर्गचे ते पालकमंत्री आहेत. दोन्ही जिल्ह्याशी त्यांचा सततचा संपर्क आहे. ग्रामीण भागातील जनतेशीही ते संपर्क साधत आहेत. बांधकाम खात्यासह अन्नपुरवठा हे खातेही त्यांच्याकडे आहे. या माध्यमातून ते मतदारसंघाशी जोडले जात आहेत. त्यांचे हे प्रयत्न उमेदवारीचे राजकीय संकेत देत आहेत.