तालुक्यातील लोटे येथे कंपनीत नोकरीच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्याच्या खूनप्रकरणी २७ वर्षे पसार संशयिताला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात खेड पोलिसांना यश आले. सुरेशचंद्र राम खीलवान (५०, छीमी पुरीइन ता. खागा, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. २००८ मध्ये स्वतःचा बनावट मृत्यू दाखला बनवून त्याने तो स्वतः १४ वर्षे मृत असल्याचे भासवित होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आणि मयत लोटे येथील एका कंपनीत कामाला होते. त्याने रागाच्या भरात सखाराम मांजरेकर याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खेड पोलिस ठाणे येथील अधिकारी यांनी प्रलंबित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजित सोनावणे, अजय कडू, वैभव ओहोळ, राम नागुलवर, तुषार झेंड यांनी ही मोलाची कामगिरी बजावली. सुमारे २७ वर्षांपासून पसार असणारा संशयित सुरेशचंद्र याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून खेड पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन येण्यासाठी उत्तर प्रदेश येथून रवाना झाले आहेत. दरम्यान संशयित गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाणे बदलून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.