गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू झाले असून संरक्षक भिंतीच्या लगत भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे आठ फुट उंचीचा भराव पूर्ण झाला असून, ३० तारखेपर्यंत भरावाचे काम संपून १ मे ला घाटातील काँक्रीटीकरणाचे काम सुरू होईल, असा विश्वास संबंधितांनी व्यक्त केला आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी ठेकेदार कंपनीकडून केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २५ एप्रिल ते १० मे पर्यंत परशुराम घाट दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घाटातील चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. परशुराम घाटातील धोकादायक ठरणाऱ्या ९०० मीटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १०० मीटर भिंतीच्या लगत असणाऱ्या जुन्या महामार्गावर भरावाचे काम जोरदारपणे सुरू असून, तीन दिवसांत सुमारे आठ फुट उंचीचा भराव करण्यात आला आहे.
दि. ३० एप्रिलपर्यंत भरावाचे काम पूर्ण होऊन काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे आणि पावसाळ्यात परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी सुरू होणार आहे, असा विश्वास कंपनीचे अभियंता शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केला आहे. घाटामध्ये जेसीबी, डम्पर, रोलर, प्रेशर रोलर या माध्यमातून केलेल्या भरावावर प्रत्येक टप्प्यात काम सुरू आहे. त्यामुळे भराव दर्जेदार पद्धतीने केला जात आहे. मातीवर योग्य ते प्रेशर आणि व्हायब्रेटर रोलरने काम सुरू आहे. भरावाचे काम पूर्ण झाल्यावर १ मे पासून काँक्रीटीकरण सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, धोकादायक ‘परशुराम घाटातील एका अवघड वळणावर काळा दगड आहे. तो फोडण्यास ठेकेदार कंपनीला सुरुंग लावण्यास विरोध होत आहे. नियंत्रित सुरूंगदेखील लावला जात नाही. त्यामुळे हा दगड फोडण्यासाठी घाटबंदीच्या काळात चोवीस तास ब्रेकर लावण्यात आला आहे. दिवस-रात्र हा दगड फोडण्यासाठी ब्रेकरची टक्टक् सुरू आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत हा दगड बाजूला होईल, असा विश्वास ठेकेदार कंपनीने व्यक्त केला आहे.