24.6 C
Ratnagiri
Thursday, December 26, 2024
HomeRajapur'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्या आमदारांचा बहिष्कार

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्या आमदारांचा बहिष्कार

‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर भाजप पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीच्या आमदारांनी बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे कार्यक्रम संपल्यानंतर उन्हात उपाशीपोटी उभे राहण्याची वेळ आलेल्या लोकांनी त्यांना रत्नागिरीत आणण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मंडळींचा भर रस्त्यात समाचार घेतल्याने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची चर्चा चांगलीच रंगली आहे. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातून एसटी महामंडळाच्या ४०० बस या कार्यक्रम साठी रत्नागिरीला आल्या होत्या. त्यामुळे जिल्हाभरातील एसटी बसची वाहतूकही गुरूवारी कोलमडली होती. गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी २५ हजार लोकं जमविण्याचे टार्गेट पक्षातील पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. अगदी बचतगटापासून पक्षाच्या कार्यकर्त्यापर्यंत साऱ्यांनाच निरोप पाठविण्यात आले होते.

नेमका कार्यक्रम कोणाचा? – ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरीत आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. मुख्यमंत्री शासकीय कार्यक्रमासाठी आल्याने सर्व आमदार, खासदार शासकीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडीचें आमदार, खासदार सोडा, भाजपचे पदाधिकारीदेखील कार्यक्रमात कुठे दिसून आले नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम नेमका कोणाचा होता असा सवाल उपस्थित करत चर्चांना पेव फुटले आहे.

लोकं उपाशी, प्रशासन तुपाशी – सकाळी ५ वाजताच मंडणगड, दापोली येथून एस. टी. च्या अनेक गाड्या रत्नागिरीसाठी सुटल्या होत्या. वाटेत वडापावची व्यवस्था झाली मात्र अडिच वाजेपर्यंत कार्यक्रमाला आलेल्या लोकांच्या पोटाची व्यवस्था झाली नाही. लोकं उपाशी अन् प्रशासन तुपाशी अशी अवस्था असल्याचे अनेकांनी जाहीरपणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तशी चर्चाही सुरू आहे.

कार्यक्रमाला २ तास विलंब – या कार्यक्रमासाठी मोठा पेंडॉल उभारण्यात आला होता. ११ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री २ तास उशीरा निघाल्याने या कार्यक्रमाला २ तासांचा विलंब झाला.

कोण कुठे पत्ताच नाही – या कार्यक्रमासाठी एस्. टी. च्या गाड्या बुक करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातून जवळपास ४०० एस्. टी. च्या गाड्या भरून लोकांना रत्नागिरीत  आणलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र कोण कुठे आहे, याचा पत्ता लागत नव्हता. जो तो आपल्या बरोबरच्या व्यक्तीला शोधत होता तर ज्या बसने आपण आलो आहोत ती बस नेमकी आहे कोठे? याचा पत्ताच काहींना नव्हता. रत्नागिरीच्या बस स्थानकाबाहेर उन्हात अनेक लोक उभे होते. सारेजण आपल्या बसच्या प्रतिक्षेत होते. मात्र बस काही आली नाही. त्यामुळे आधीच्या उन्हाने तापलेल्या लोकांचा संतापाचा पारा अधिक वाढला.

धारेवर धरले? – तुम्ही आम्हाला लाभार्थी म्हणून आणलात, पण उन्हात उभं राहण्याची शिक्षा तुमच्यामुळे आम्हाला मिळाली असे सांगत अनेकांनी कार्यक्रमासाठी आणणाऱ्या पुढाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे चर्चिले जात होते. अनेकजण उन्हातान्हात चालत आपली बस कुठे आहे हे शोधण्यासाठी पायपीट करीत. होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी एस्. टी. च्या ४०० गाड्या बुक करण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात गाड्या बुक झाल्याने जिल्ह्यातील एस्.टी. ची वाहतूक कोलमडली. ग्रामीण भागातील अनेक बस फेऱ्या गाड्यांअभावी बंद पडल्या. अचानक एस्. टी. ची फेरी बंद झाल्याने ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल झाले.

RELATED ARTICLES

Most Popular