22.8 C
Ratnagiri
Friday, December 27, 2024
HomeChiplunचिपळूण रेल्वेस्थानकाजवळील परिसरात ६८.४२ लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त

चिपळूण रेल्वेस्थानकाजवळील परिसरात ६८.४२ लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ : वर अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन ठिकठिकाणी गस्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे एक पथक महामार्गावर अचानक वाहन तपासणी व गस्त घालत असताना वालोपे गावचे हद्दीत चिपळूण रेल्वे स्टेशन फाट्याजवळ तब्बल ६८.४२ लाखांचे विदेशी मद्य, वाहन आणि कोळसा पावडर, मोबाईलसह एकूण ९२, ६२, ५०० रूपयांचा माल जप्त केला. गुरूवारी दुपारी ४.३० वा. ही कारवाई करण्यात आली. या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सापळा रचला होता. चिपळूणकडून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करीत असताना एक संशयित पांढऱ्या रंगाचा ट्रक आढळला. तो तपासणीसाठी थांबवण्यात आला. ट्रकच्या मागील हौद्यामध्ये सुमारे २० किलो क्षमतेच्या कोळसा पावडरने भरलेल्या एकूण १२५ पोलीथीन गोणी आढळल्या. या गोणींच्याआड कागदी पुठ्याचे बॉक्स दिसून आले.

या बॉक्समध्ये काय आहे? ते पाहिले असता त्यामध्ये आईस मॅजीक (ऑरेंज फ्लेवर वोडका) आणि आईस मॅजीक (ग्रीन अॅपल वोडका) या दोन ब्रँडच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या एकूण ९५० बाक्समध्ये ९९४०० सीलबंद बाटल्या मिळाल्या. या विदेशी मद्याची अंदाजे किंमत रु. ६८,४०,०००/- व ट्रकची अंदाजे किंमत रु.२४,००,०००/- कोळसा पावडरची किंमत रु.१२५००/- व विवो कंपनीचा एक मोबाईल त्याची अंदाजित किंमत रुपये १०,०००/- असा एकूण रु. ९२,६२,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात न आला. या मद्याच्या बाटल्यांवरील लेबलचे तपशील तपासले असता . बोगस कागदपत्रांच्या आधारे गोव्यातून महाराष्ट्रात विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित मद्याचे उत्पादन गोव्यामध्ये झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान याप्रकरणी ट्रक चालक सुरेश हरिबा पाटील (रा. शिवाजीनगर कडेगाव, जि. सांगली) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व संचालक सुनिल चव्हाण यांचे आदेशान्वये तसेच विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर व रत्नांगिरी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरीक्षक व्ही. एस. मासमार दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे, गणेश नाईक, सहा. दु. निरीक्षक राजेंद्र भालेकर, तसेच जवान सावळाराम वड, यांनी भाग घेऊन कामगिरी बजावली आहे. तसेच तुषार शिवलकर व सिद्धार्थ जाधव यांनी सदर कारवाईकामी मदत केली. वरील गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक व्ही. एस. मासमार करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular