रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत असून काही ठिकाणी त्यामुळे पडझड झाली आहे. या पार्श्वभूमिवर रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरील प्रसिद्ध आंबा घाटातील गायमुखाजवळ असलेल्या गणपती मंदिरावर एक भलामोठा दगड कोसळला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. डोंगरातून उन्मळून पडलेल्या या अजस्त्र दगडामुळे गणपती मंदिराचे मोठे नुकसान झाले. मात्र मंदिरातील गणेश मूर्ती सुरक्षित आहे. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य भागातून नागरीक या मार्गाने नेहमीच प्रवास करत असतात. या परिसरातील अनेक भाविक गणपतीपुळे ‘येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असतात. हे भाविक आंबा घाटातील या गणेश मंदिरात थांबून आवर्जुन दर्शन घेत असतात. आंबा घाट हा पर्यटकांचे देखील आवडते ठिकाण आहे.
येथील गणपती मंदिरातील गणपती बाप्पा संकटमोचक असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे. शनिवारी या परिसरात जोरदार पाऊस कोसळत होता. आंबा घाटातील डोंगरावरील एक भलामोठा दगड अचानक कोसळला. सुदैवाने त्यावेळी घाटातून प्रवास करणाऱ्या कोणालाही इजा झाली नाही. गणपती मंदिरावर हा दगड थेट कोसळल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र गणेशमूर्ती सुरक्षित आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ही दरड कोसळली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रविंद्र मानेंचे प्रयत्न आंबा घाटात हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्याचे भूतपूर्व पालकमंत्री रविंद्र माने यांच्या प्रयत्नांतून उभे राहिले. याठिकाणी पूर्वापार एक घुमटी होती त्यामध्ये गणपतीची मुर्ती होती. रविंद्र माने यांनी पालकमंत्री असताना हे मंदिर उभे रहावे यासाठी सारे प्रयत्न केले आणि त्यातूनच आजचे हे मंदिर उभे राहिले आहे.