व्हिएतनामच्या अभ्यासकांकडून कातळशिल्पांची पाहणी करण्यात आली. जोडीला काही पर्यटकही होते. या मंडळींनी रूढे आणि बारसू या ठिकाणी एकत्र भेट दिली. आलेल्या मंडळींसाठी हा विषय नावीन्यपूर्ण होता आणि तो समजून घेण्याची भूकदेखील तेवढीच तीव्र होती, असे सुधीर (भाई) रिसबूड, ऋत्विज आपटे, धनंजय मराठे यांनी सांगितले. वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. रितेश चौधरी गेली अनेक वर्षे अभ्यासानिमित्त कोकणात येत आहेत. त्यांनी त्यांचे स्नेही वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सरदेसाई यांच्या स्टेटसवर काहीतरी वेगळे पाहिले. ते काय हे समजून घेताना त्यांना कोकणातील कातळशिल्पासंदर्भात माहिती मिळाली. हाच विषय त्यांनी परदेशी अभ्यासकांच्या कानावर घातला.
या नवीन विषयाच्या ओढीने नियोजित कार्यक्रमात आयत्यावेळी बदल करून ते रत्नागिरीमध्ये आले. रत्नागिरीकडे येताना उक्षी येथील कातळशिल्पाला भेट दिल्यावर या विषयात अधिक जाणून घेण्याची त्यांना इच्छा तीव्र झाली. रत्नागिरीत निसर्गयात्री संस्थेशी त्यांनी संपर्क साधला. या संवादादरम्यान सुहास ठाकूर देसाई यांनी आलेल्या पाहुण्यांना प्रेझेंटेशनची सोय उपलब्ध करून दिली. या कातळशिल्प भेटीदरम्यान आजूबाजूच्या परिसरातील, सड्यावरील आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सर्वांना अनुभवण्यास मिळाली. पावसाच्या दिवसात सड्यावर एक अनोखे जीवनचक्र अनुभवयास मिळते.
वेगवेगळ्या वनस्पती आपले अस्तिव दाखवायला सुरुवात करतात. कातळशिल्पांच्या जोडीने परिसर फिरल्यामुळे आम्हालाही वनस्पती जगतातील नवीन गोष्टी कळल्या. प्रवासात असताना सर्वांना एके ठिकाणी सड्याचा भाग गुलबट रंगाच्या फुलांनी न्हाऊन निघालेला दिसला. अत्यंत अल्प स्वरूपात झालेला पाऊस तरीदेखील या दिवसात मोठ्या प्रमाणात गुलबट रंगाच्या फुलांनी बहरून गेलेला परिसर पाहून सर्वांनाच थोडे आश्चर्य वाटले.