हवामान विभागाचा इशारा सत्यात उतरत रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. बुधवारी (ता. २८) दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर भंडारपुळे येथे वहाळावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर वेगवान वाऱ्यांमुळे चार घरांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून गुरुवारपर्यंत (ता. २९) जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गतवर्षीपेक्षा पन्नास टक्के कमी पाऊस झाला आहे. गेले ३ दिवस जिल्ह्यात सरींचा पाऊस पडला होता; मात्र मंगळवारी मध्यरात्रीपासून वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. दिवसभर संततधार पाऊस पडता होता. दुपारी जोर ओसरला; परंतु सायंकाही पुन्हा सुरुवात झाली.
सकाळच्या सत्रात पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी शहरात छत्रपती शिवाजी क्रीडांगणामागील भाजी मार्केटजवळील रस्त्यावर रस्त्यावर पाणी साचलेले होते. सन्मित्रनगर येथे रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी पालिकेचे कर्मचारी भरपावसात सक्रिय होते. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे मार्गावर भंडारपुळे येथे डोंगरातून येणाऱ्या वहाळाला प्रचंड पाणी आल्यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर पाऊस कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दापोलीत राजेंद्र काशिनाथ पारगले यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडून गेल्यामुळे ९ हजारांचे, खेड तुळशी बुद्रुक येथे प्रकाश कृष्णा सुतार यांच्या घराच्या पडवीवर दगड कोसळून १५ हजारांचे, संगमेश्वरात ओझरे बुद्रुक येथील सुगंध शेजवळ यांच्या घरावर झाड पडल्याने ६ हजार रुपये, तर रत्नागिरी सोमेश्वर येथील शरद रसाळ यांच्या घरावर झाड पडून ८२ हजारांचे नुकसान झाले आहे.
सरासरी २६५ मिमी पाऊस – बुधवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४७.२२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ५५, दापोली ४७, खेड २३, गुहागर ४५, चिपळूण ५९, संगमेश्वर ६०, रत्नागिरी ४९, लांजा ६८, राजापूर १९ मिमी पाऊस झाला. १ जूनपर्यंत आतापर्यंत सरासरी २६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ५७६ मिमी पाऊस झाला होता.