मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण पावसाळ्यात वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोकणात येणाऱ्या काही प्रवाशांनी रस्त्याची दयनीय अवस्था मोबाईलवर रेकॉर्ड करत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आहे की, पायवाट हेच कळत नाही. शासन आणि लोकप्रतिनिधींना याची थोडीतरी लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केंद्र आणि राज्य शासनासासाठी खरंच डोकेदुखी बनले आहे.
एक-दोन वर्षे नव्हे तर बारा ते तेरा वर्षांपासून हे काम सुरू आहे ते अजून संपलेले नाही. त्यानंतर समृद्धी महामार्गाचे काम सुरू होऊन पूर्णही झाले तरी हा मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. याबाबत अनेक ठेकेदार कंपन्यावर कारवाई केली. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाची हवाई पाहणी केली. डिसेंबरअखेर किमान एकेरी मार्ग पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गाच्या कामाचा दोनवेळा आढावा घेतला.
आम्ही कंबरडे मोडायचे काय? – कोकणात येणाऱ्या गुजन नामक एका व्यक्तीने रात्री २ वाजता महामार्गावरील एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. मी आज ज्या ठिकाणी उभा आहे, हा राष्ट्रीय महामार्ग की पायवाट हेच कळत नाही. पायवाटदेखील यापेक्षा चांगली असते एवढी दयनीय आणि वाईट परिस्थिती या महामार्गाची झाली आहे. आम्ही या मार्गावरून जाऊन कंबरडे मोडून घ्यायचे का? यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन शासन आणि लोकप्रतिनिधींना लाखोल्या वाहिल्या.