रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी ‘दुर्घटनेनंतर सतर्क झालेल्या तालुका प्रशासनाने राजापूर तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रात राहत असलेल्या ग्रामस्थांना स्थलांतरीत होण्याचे आदेश दिले आहेत. शहरानजीकच्या धोपेश्वर खंडेवाडी हा परिसर अनेक दशकांपासून डेंजर झोनमध्ये समाविष्ठ असून गुरूवारी प्रशासनाने ग्रामस्थांसोबत बैठक घेत तत्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जवाहरचौकात घुसलेले पाणी ओसरले असले तरी राजापुरातील शिवाजी पथ, वरचीपेठ रस्ता गुरूवारीही पाण्याखाली होता. गुरूवारी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ गटविकास अधिकारी विवेक गुंड आदींनी खंडेवाडीतील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी प्रांताधिकारी यांनी एकूणच परिस्थितीबाबत माहिती देत ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी तरी किमान अन्यत्र स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. खंडेवाडीतील ग्रामस्थांचे स्थलांतर करताना त्यांची तात्पुरती व्यवस्था शहरातील श्रीमंगल कार्यालय येथे करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी यांनी दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ग्रामस्थांनी स्थलांतरित व्हावे, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रांताधिकारी यांनी दिला. या बैठकीला ग्रामसेवक निरंजन देसाई, मंडळ अधिकारी बाजीराव पाटील, माजी उपसरंपच साक्षी ओगले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पावसाचा जोर कायम – तालुक्यात पावसाचा जोर कायम असून शहरातील अर्जुना व कोदवली नदीला आलेले पूराचे पाणी जैसे थे आहे. बुधवारी रात्री जवाहर चौकात काही प्रमाणात आलेले पाणी काहीसे ओसरले असले तरी शिवाजीपथ, वरचीपेठ रस्ता अद्यापही पाण्याखाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तालुक्यात मागील दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली. नद्यांच्या पातळीत बुधवारी वाढ झाली होती. मात्र रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाले आहे. गुरूवारी सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पूराच्या पाण्यात वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गुरूवारी दिवसभर पूराचे पाणी जवाहर चौकातील टपऱ्यांपर्यंत होते. तर चिंचबांध ते वरचीपेठ व पुढे शिळ रस्ता पाण्याखाली होता.