रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील जंगलवाडी, देवळे (ता. संगमेश्वर) या दोन गावांमध्ये गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दहा ते बारा गव्यांचा कळप असून गेले दोन ते तीन महिने त्यांचे वास्तव्य आहे. या गव्यांनी काही शेतकऱ्यांच्या बागायतीचेही नुकसान केले आहे. संगमेश्वर, लांजा, राजापूर परिसरात गव्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यात देवळे, जंगलवाडी, चाफवली या परिसरात आंबा हंगामापासूनच गव्यांचा कळप फिरत आहे. त्याचा शेतकारी वर्गाला त्रास होत आहे. कळपच्या कळप बागेमध्ये शिरुन आंबा, काजुची झाडे मोडून टाकतो. याबाबत अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शरीर घासून आंबा कलमांचीही मोठी नासधूस केल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत.
मे महिन्यात आंबा बागांचेही नुकसान झाले आहे. आठ ते दहा गव्यांचा कळप सध्या जंगलवाडी, देवळे फाट्यावर दररोज दिवसाही दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या फाट्यावरूनच देवळे, चाफवली, मेघी या भागातील महिला, विद्यार्थी, प्रवांशाना उतरून गावाकडे यावे लागते. याच भागात गव्यांचा वावर असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मे महिन्यात या गव्यांनी बागायतींचे मोठे नुकसान केले होते. वनविभागाकडे गेल्यास पंचयाद्या, सातबारा यासाठी वारंवार खेटे मारावे लागतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या गव्यांपासून शेती कशी वाचवावी, ही चिंता या परिसरातील शेतकऱ्यांपुढे आहे. वनविभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.