धो-धो कोसळणाऱ्या पावसात निवळी घाटात दरड कोसळली आणि मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली. गुरूवारी पहाटे सारेच साखरझोपेत असताना दरड कोसळण्याचा प्रकार घडला. मात्र याची माहिती माजी जि. प. सदस्य बाबूशेठ म्हाप यांना समजताच मशिनरी घेऊन त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दीड तासात रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. गुरूवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास निवळी-बावनदीनजीक घाटात दरड कोसळली. रस्त्यावर अचानक दरड कोसळल्याने हा महामार्ग ठप्प झाला. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी बावनदी येथे दरड कोसळली. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून महामार्ग ठप्प झाला.
या घटनेची माहिती मिळताच बावनदी निवळी परिसरातील रामू वडार, संतोष पाध्ये, दिपक कोकजे, विशाल गावडे, राहुल सावंत, सरपंच तन्वी कोकजे घटनास्थळी दाखल झाले. मुंबई-गोवा महामार्ग तातडीने सुरु करण्यासाठी महामार्गावरील दरड हटवणे गरजेचे होते. या मंडळींनी ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांच्या कानावर घातली. तातडीने बाबू म्हाप यांनी जेसीबी पाठवून महामार्गावरील दरड हटवली आणि रस्ता मोकळा करून दिला. सरकारी यंत्रणेची वाट न पाहता तातडीने स्वतःची मशिनरी लावून रस्ता मोकळा करून दिला. यामुळे महामार्गावरील प्रवाशांनी बाबू म्हाप आणि निवळी बावनदी परिसरातील ग्रामस्थांचे आभार मानले.