मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रुंदावल्या आहेत. याशिवाय घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत. एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रिटला २ जुलैला तडे गेले होते. त्या वेळी तडे गेलेल्या भागात सिमेंट भरून त्याची ताप्तुरती डागडुजी केली होती; मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात तडे गेलेल्या जागी भेगा पुन्हा रूंदावल्या आहेत.
तेथील काही भाग खचल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परशुराम घाट सुमारे ५.४० किलोमीटर लांबीचा असून, घाटात एकेरी मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम पाऊस सुरू होण्याआधी पूर्ण केले; मात्र दुसऱ्या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्याआधीच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने काम थांबवण्यात आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक दरडी कोसळल्याने त्यात यंत्रणा गुंतली; मात्र आठवडाभरात झालेल्या पावसात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे. एकेरी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर दरडी आल्याचे दिसून येत आहे. त्यातील भरावदेखील हलवलेला नाही. त्यामुळे आणखी दरड कोसळल्यास दुसऱ्या मार्गावर दगडगोठे व माती येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटातील लांबीपैकी १.२० किमी लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दऱ्या असल्याकारणाने डोंगरकटाईनंतर या भागात जुलै महिन्यात दगड, माती अधूनमधून कोसळत आहे. परशुराम घाटातील दुसऱ्या मार्गावरदेखील जागोजागी तडे गेले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण खचले आहे. त्यामुळे त्या-त्या ठिकाणचे तडे व भेगादेखील रुंदावत आहेत. घाटातील प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी रस्त्यावर दरडी आल्यास वाहतूकदारांच्या लक्षात येण्यासाठी विजेची व्यवस्था केली आहे. परंतु, दरडीच्या बाजूने असलेल्या मार्गावर आलेला माती भराव तातडीने बाजूला करण्याची गरज असून, ठेकेदार कंपनीने त्याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.