आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांसाठी ९.५० कोटींचा निधी मंजूर झाला होता. या विकास कामांना विरोध केला जात आहे, असा आरोप लांजा नगरपंचायतीमधील ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी आमदार साळवी यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला होता. मात्र नगरपंचायत कार्यक्षेत्र म्हणून प्रशासकीय मंजुरीसाठी ९ मे २०२३ च्या पत्रानुसार सर्वसाधारण सभेचा ना हरकत ठराव व अन्य कागदपत्रे मिळण्यासाठी नगरपंचायतीकडे पत्रव्यवहार केला. परंतु तीन महिने झाले तरीही हा विषय सर्वसाधारण सभेच्या पाटलावर आलेला नाही.
१४ जुलैला झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त १४ दिवस होऊनही नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तसेच लेखी मागणी केली असतानाही ते देण्यास टाळाटाळ केली जात आहे. वास्तविक पाहता नियमानुसार सभा पार पडल्यानंतर सात दिवसांमध्ये इतिवृत्त प्रसिद्ध करावे लागते. त्यावर नगराध्यक्षांची सही लागते. मात्र लांजा नगरपंचायत प्रशासनाकडे इतिवृत्ताची मागणी केली. मात्र इतिवृत्त तयार असून नगराध्यक्षांची सही झालेली नाही असे सांगण्यात आले, अशी माहीती नगरपंचायतीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नगरसेवक पूर्वा मुळ्ये, यामिनी जोईल, स्वरूप गुरव, लहू कांबळे व राजेश हळदणकर यांनी दिली.
नगरपंचायतीमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. विकासकामांना खिळ घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगराध्यक्षांना सर्वसामान्य जनतेतून निवडून आलो आहोत, याचा जणू विसर पडलेला दिसतो. केवळ राजकीय द्वेषापोटी अनेक विकासकामांच्या वर्क ऑर्डर तयार असूनही त्यावर सह्या झालेल्या नाहीत, असे ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सांगितले.