रॉयल मॉल कंपनीत कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, तसेच चारशे बेरोजगार तरुणांना नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत एकाने सुमारे २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. नाशिकमधील इगतपुरी पोलिसांनी मूळचा चिपळूण तालुक्यातील ओमळी पवारवाडी मारुती मंदिराजवळील संशयित आरोपी दिनेश गणपत पवार (सध्या रा. गिरणारे, इगतपुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शंकर आनंदा उबाळे (वय ४२, रा. खालची पेठ, गणपती मंदिराजवळ, इगतपुरी) यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. इगतपुरी शहर व परिसरात वाढती बेरोजगारी असून, सुशिक्षित बेरोजगार काम व व्यवसायाच्या शोधात असताना बाहेरील व्यक्ती अनेक वर्षापासून त्यांची फसवणूक करत आहे.
नोकरी लागावी म्हणून युवकांकडून शासनस्तरावरही ऑनलाईन फॉर्म शुल्कच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या युवकांपुढे पेच निर्माण होत आहे. अशातच इगतपुरी शहरात फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व शंकर आनंदा उबाळे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी दिनेश पवार याने २०१६ पासून इगतपुरी शहरातील रहिवासी शंकर उबाळे व साक्षीदार संदीप काशिनाथ फोडसे, पोपट बुधा भले यांच्याशी मैत्री केली. तुम्हाला रॉयल मॉल कंपनीचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, असे सांगून १५ लाख ५० हजार रुपये बँक खात्यातून ग्रीन रेबिड कार्डद्वारे रक्कम घेतली.
तसेच चारशे बेरोजगार युवकांकडून प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये याप्रमाणे १४ लाख रुपये जमा करून एकूण २९ लाख ५०० हजार रुपयांची फसवणूक केली. इगतपुरी शहर व परिसरात कोणताही उद्योग रोजगार नसल्याने अनेक बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात धडपड करत असतात. त्यांना आमिष व प्रलोभने दाखवत त्यांची लूट केली जात असतानाच फसवणूक झालेल्यांमध्ये चारशे बेरोजगार युवक व तीन हातमजूर आहेत. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.