डोंगर रांगातून फेसाळत कोसळणारे धबधबे, थंडगार पाण्याच्या ओढ्यातून चालणारे लाल रंगाचे खेकडे, डोंगरांना टेकलेले आकाश, गर्द झाडीतून येणारा गार वारा, असे नयनरम्य ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी अनेक पर्यटकांचे जथ्येच्या जथ्ये रघुवीर घाट परिसरात भेट देत आहेत. रघुवीर घाट हा मध्यंतरी मुसळधार पावसामुळे बंद होता. सध्या तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रघुवीर घाटात हजारोंपेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असल्याने शासनाने हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून जाहीर करावे, अशी मागणी परीसरातून होत आहे. रत्नागिरीला सातारा जिल्ह्यास जोडणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गावर पूर्वी घोडे, खेचर व बैलगाडी चालत होती.
कोकणातून समुद्र मार्गे येणारा माल हा येथून पुढे सातारा महाबळेश्वर मार्गे पुणे बाजारपेठेत जातं होता. हा बैलगाडीचा रस्ता मधल्या काळात पूर्णपणे अडगळीत सापडला होता. १९८० च्या दशकात रघुवीर घाट तयार करण्यात आला. रघुवीर घाटाचा जूना इतिहास हा परीसतील मंदिर, रस्ते पाहील्यावर साक्ष देत आहे. रघुवीर घाट हा डोंगर रांगातून काढलेला मार्ग आहे. खोपी गावच्या रघुवीर मंदीराजवळून या घाटाची सुरुवात होते. घाटात दिवसभर शेकडो पर्यटक येथे भेट देतात. मुंबई, पुणे सह इतर अनेक जिल्ह्यांतील नागरिक येथे येऊन निसर्ग सौंदर्य न्याहाळून जातात. घाटातील पाऊस हा सतत सुरु असतो.
दाट धुके आणि पाऊस याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. परीसरातील शिरगाव पिंपळवाडी धरणातील पाणी साठा सगळ्यांना भूरळ घालतो. शिरगाव खोपीचे ग्रामदेवता मंदिर पूर्वकालीन आहे. परीसरातील अनेक गावात विविध मंदिरे इतिहासाची साक्ष देत आहेत. रघुवीर घाटात शेकडो पर्यटक येतात. तर रजेच्या दिवशी हा आकडा हजारांचा असतो. खेड वरुन दुचाकी, रिक्षा, मिनीबस, खाजगी वाहनाने येथे दररोज जत्रेचे स्वरुप असते. पुढे कांदाटी खोरे भागातील शिंदी, वळवण, उचाट, पार, अकल्पे, आरव या गावातून कोयना धरणाच्या बॅकवॉटर परीसरात फिरायला जाणे सोपे आहे. हा परिसर शासनाने पर्यटन केंद्र म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.