दाभोळ खाडीतील प्रदूषण आणि त्या निमित्ताने लोटे औद्योगिक वसाहतीत घेण्यात आलेल्या शोधमोहिमेत कारखान्यांचे सांडपाणी हे कारखान्याबाहेरून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये आढळले. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कारखान्यांना निर्देश दिले आहेत; मात्र राजरोसपणे सांडपाणी सोडणाऱ्या या कारखान्यांना केवळ नोटिसा देत न बसता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी दाभोळ खाडी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. गेल्या आठवड्यात दाभोळखाडीत मासे मृत झाल्याचे समोर आल्यानंतर खाडीत पाहणी करण्यात आली. या वेळी मृत मासे आणि पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.
दरम्यान, लोटे सीईटीपी सक्षमपणे कार्यरत असतानाही खाडी प्रदूषण कोणत्या कारणाने होते. याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसाहतीत करताना वसाहतीतील नाल्याची तपासणी सुरू केली. काही कारखान्यांतून सांडपाणी जवळच्या नाल्यात जात असल्याने या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले. त्यानुसार पंचनामा करून मंडळाकडून प्रस्तावित निर्देश देण्यात आले आहेत. या कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण संघर्ष समितीने आक्रमक पाऊल या प्रकरणी आता दाभोळ खाडी उचलले आहे. खाडी प्रदूषणप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रांताधिकारी यांना निवेदने देऊन स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर म्हणाले, खाडी प्रदूषणाने मच्छीमार समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कारखानदारही सांडपाणी नाल्यांमध्ये सोडत आहेत. सीईटीपी प्रकल्प सुस्थितीत चालवला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्चून एअर मॉनिटरिंग सिस्टीमही बसवली आहे. सांडपाण्यासंदर्भात सीईटीपी तांत्रिक समितीही कार्यरत आहे. त्यामुळे सुसज्ज सीईटीपीत कारखान्यांतील सांडपाणी सोडणे आवश्यक असताना काही ठराविक कारखानदार ते सोडताना दिसत नाहीत.