मागील दहा वर्षापेक्षा अधिक काळ गाजत असलेला मुंबई-गोवा महामार्गाचे कासवाच्या गतीने सुरु असलेले कामकाज, इतर महामार्ग सुरू झाले, मात्र कोकणावर कायमच अन्याय होत आला आहे. यासाठी कोकण हायवे समन्वय समितीने आवाज उठवला आहे. कोकण विभागातील सर्व महामार्गाची वेळ खाऊ कामे लवकरात लवकर व्हावे यासाठी समन्वय समितीने मानवी साखळी अभियान राबवण्याचे ठरवले आहे.
चिपळूण येथील बहादुर शेख नाका येथे ९ ऑगस्टला अभियानाचा पहिला टप्पा करण्यात येणार आहे, अशी माहिती चिपळूण येथील बैठकीत संजय यादवराव यांनी दिली. कोकण हायवेची अक्षरशा चलन झाली असून, एक एक खड्डा चुकवत मार्ग कसा काढायचा हा प्रश्न विहान चालकांना भेडसावत आहे. अनेक मार्गात अजूनही त्रुटी दुरुस्त केल्या नसून, काही ठिकाणी सर्व्हिस रोड, बायपास रोड देखील केलेले नाहीत. मग वाहतूक तरी कोणत्या मार्गाने करायची !
अनेक शाळा, महाविद्यालय या महामार्गालगत आहेत. हजारो मुलांना हायवे क्रॉस करताना घाबरून जायला होते, एखाद्या वेळी काही दुर्घटना घडली तर, त्याची जबाबदारी कोण घेणार, असे एक ना अनेक प्रश्न समोर आहेत. हायवेचा मार्ग सुस्थितीत व्हावा यासाठी कोकण हायवे समन्वय समिती मानवी साखळी अभियान उभारणार आहे.
गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे, अनेक कोकणवासीय त्याच मार्गावरुन प्रवास करतात, तेंव्हा खड्डे चुकविताना त्यांच्या नाकी नऊ येतात. वाहनांचे नुकसान होते ते वेगळेच. शारीरिक त्रास जाणवतो. गणेशोत्सवापूर्वी हे अभियान अजून तीव्र होणार आहे, कोरोनाचे नियम पाळुन एक तास काळ्या फिती लावुन क्रांतीदिनी हे मानवी साखळी अभियान चिपळुण बहादुर शेख नाका येथे सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. पुढील पंधरा दिवसांनी अभियानाचा दुसरा टप्पा जाहीर केला जाणार आहे. कोकणातील जनतेने आपल्या न्याय हक्कांसाठी या अभियानात हिरीरीने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय यादवराव यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
चिपळूण येथील ॲड. ओवेस पिचकर यांनी संपुर्ण महामार्गाची पाहणी करून फोटो व व्हिडीओसह संबंधित विभाग व संबंधित कंत्राटदार, कंपन्यांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी होऊन २०२२ पर्यंत महामार्गाचे काम पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सदर बैठकीस ॲड. ओवेस पिचकर, अन्वर पेचकर, युयुत्सु आर्ते, चिंतामणी सप्रे, राजेंद्र शिंदे, निसार शेख आदिं सह पत्रकार व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.