24.4 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriधरण गळतीबद्दल जिल्हाधिकार्यांचे आवाहन

धरण गळतीबद्दल जिल्हाधिकार्यांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्पाची गळती थांबविण्यासाठी रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. धरण सुरक्षिततेच्या बाबतीत ‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे कार्यकारी अभियंता यांनी घटनास्थळी जाऊन धरणास भेट दिली असून धरण सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे.

१९९५-९६ साली पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प योजनेतंर्गत पणदेरी धरण पूर्ण करण्यात आले आहे. ५ जुलैला दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला धरणातून गळती होत असल्याचे समजल्यानंतर रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून गळती रोखण्यासाठी तत्परतेने उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये जिथे गळती होते आहे तिथे मातीचा भराव टाकून गळती थांबविण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी पोलीस सुद्धा आवश्यक साधन सामग्रीसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

धरणफुटीचा धोका टाळण्यासाठी धरणातील पाण्याची पातळी कमी करणे गरजेचे आहे. पाण्याचा दाब जास्त असल्याने धरणाच्या खालच्या बाजूस पणदेरी मोहल्ला, सुतारवाडी, पाटीलवाडी, कुंभारवाडी, रोहिदासवाडी व बौद्धवाडी येथे लोकवस्ती असून या वाडी व गावातील लोकांना खबरदारी म्हणून  रोहिदासवाडी व बौद्धवाडी येथील सुमारे २०० ग्रामस्थांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था तिथे करण्यात आली आहे.

सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून धरणाच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्ससह आरोग्य पथक, पोलीस बंदोबस्त व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जनतेला कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे संभाव्य होऊ शकलेली जीवितहानी टाळण्यासाठी सर्व पूर्व नियोजन करण्यात आले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

धरण सुरक्षिततेच्या बाबतीत ‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे’ डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे कार्यकारी अभियंता यांनी धरण सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, घाबरुन जाऊ नये. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत असल्याची शक्यता वाटल्यास मंडणगडचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular