पालिका प्रशासन आणि जैन यांच्या पुढाकाराने शहरातील ३० मोकाट गुरे पकडून ती चंपक मैदानातील कंपाउंडमध्ये ठेवण्यात आली आहेत. त्यांना निवाऱ्यासाठी शेड बांधली चारापाण्याची असून त्यांच्या व्यवस्थाही केली गेली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही या गुरांची तपासणी होत आहे. त्यामुळे मोकाट गुरांच्या उपद्रवापासून शहरवासीयांची सुटका होणार आहे. शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न प्रसारमाध्यमांसह नागरिकांनी आवाज उठवत पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनीही याबाबत बैठक घेऊन तात्पुरता उपाय म्हणून चंपक मैदानात कंपाऊंड करून ही मोकाट गुरे तेथे ठेवण्याचा निर्णय झाला.
१७ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली होती. चंपक मैदानावर मोकाट गुरांना ठेवण्यासाठी कंपाऊंड घालण्यात आले आहे. त्यात चारा छावणीचे काम सुरू आहे. तसेच, एक शेड बांधण्यात आली आहे. या कंपाऊंडमध्ये पाण्याची विहीर असल्याने गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. चारादेखील पुरवण्यात आला आहे. पावसामुळे ओला चारा असल्यामुळे गुरांना त्याचा फायदा होत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये शहरातील ३० मोकाट गुरांना पकडून चंपक मैदानाच्या कंपाऊंडमध्ये ठेवली आहेत. महेश जैन आणि पालिकेच्या पुढाकारातून गुरांची देखभाल केली जात आहे. शहरात पाणीप्रश्न गंभीर असल्याने पालिकेचे अनेक कर्मचारी जॅकवेल येथे कामासाठी आहेत, तरीही काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील मोकाट गुरे पकडून चंपक मैदानात आणली जात आहेत.