वालोपे येथून माल भरून चिपळूण शहरात आलेल्या आयशर टेम्पोला विद्युत भारित तारेचा स्पर्श झाला आणि आगीच्या ज्वाला निघाल्याने टेम्पोने पेट घेतला. टेम्पोत कापूस तसेच फोमच्या सीट होत्या. त्यामुळे काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण टेंपोला आगीने घेरले. नगरपालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ दाखल झाला आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत टेम्पो आणि टेम्पोतील सर्व सामान जळून खाक झाले होते. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. या बाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार चिपळूण शहरातील कावीळ तळी येथील अल्ताफ इब्राहिम शेख यांचा मालकीचा आयशर टेम्पो मुराद शाह हे चालवत होते. आगीने पेट घेतला.
टेम्पोला आग लागताच चालकाने खाली उतरून धूम ठोकली. तर आजूबाजूचे लोक मदतीसाठी तात्काळ धावून आले. विद्युत वाहिनी टेम्पोच्या बरोबर वरील भागात होती त्यामुळे टेम्पोत चढणे देखील धोकादायक होते. महावितरण कार्यालयाला या बाबत माहिती मिळताच अधिकारी देखील धावून आले. तात्काळ शहराचा वीजं पुरवठा बंद करण्यात आला. तसेच चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंब देखील दाखल झाला आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुमारे अर्धातासानंतर आग आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत टेम्पोतील सामान व बहुतांश टेम्पो जळून खाक झाला होता. रस्त्याच्या मधोमध ही घटना घडल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प पडली होती.
पोलिसांनी तात्काळ वाहतूक अन्य बाजूने वळवली. तसेच गर्दी बाजूला करून परिसर मोकळा केला. आग विझवळ्यांतर टेम्पो बाजूला करण्यात आला. चिपळूण पोलीस ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली असून पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी चिपळूण नगर परिषदेचे राजेंद्र खातू, बापू साडविलकर, अमोल वीर व इतर अग्निशमन दलाचे कर्मचारी वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटेकर, पृथ्वी पवार, संतोष पवार, सुनील चव्हाण, उमेश पवार, जिगनू पवार, राकेश गोरिवले इतर अनेक युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.