तालुक्यातील ओमळी पंचक्रोशीतून वाहणाऱ्या कापशी नदीचे पाणी काळसर झाल्यामुळे ते दूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नदीवर अवलंबून असलेल्या पाणी योजनेतूनदेखील अशा दूषित पाणीपुरवडा होत आहे. त्यामुळे अनेकांना साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी नदीची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ओमळी सोसायटीचे अध्यक्ष पप्या चव्हाण व शाखाप्रमुख नीलेश घडशी यांनी केली आहे. ओमळी पंचक्रोशीतून वाहणाऱ्या कापशी नदीचे पाणी काळसर झाले आहे.
रसायनामुळे दरवर्षी हा प्रकार घडतो. परिणामी, या परिसरातील नद्या दूषित होऊन त्यावर अवलंबून असलेल्या नळ पाणी योजनांमधून हे पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. २००२ पासून हा प्रकार सातत्याने सुरू असून ओमळी ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतलेली नाही. याबाबत पाच वर्षे सरपंच व सदस्यांचा वेळ पाठपुरावा करण्यातच गेला. याविषयी शासनाने वेळीच दखल घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. दरवर्षी साधारणतः दिवाळीदरम्यान कापशी नदीतील दूषित होते.
यावर्षी दिवाळीपूर्वीच पाणी दूषित झाले आहे. तहसीलदारांनी पाहणी करून खात्री करून घ्यावी. सावर्डेपासून ते वीर बंदरपर्यंत सर्वच नळ पाणी योजना या नदीवर अवलंबून आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. याबाबत वेळीच दखल न घेतल्यास ओमळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांमार्फत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अध्यक्ष चव्हाण व शाखाप्रमुख घडशी यांनी दिला आहे.