संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गावात गावचा नावदर्शक विद्युत बोर्ड अज्ञातांनी तोडला. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील अज्ञातांनी फाडल्याचा प्रकार घडला आहे. याची कसून चौकशी करून संबंधित आरोपीला त्वरित अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन आज साखरपा पोलिसांना देण्यात आले. या प्रकरानंतर गावाची शांतता भंग झाली आहे.
या वेळी उपसरपंच आणि उपतालुकाप्रमुख शिवसेना (शिंदे गट) संजीव चव्हाण, सरपंच शीतल गार्डी रूपेश चव्हाण, एकनाथ शिंदे, किरण चव्हाण (माजी सरपंच), अरुण गोरुले (माजी सरपंच), दीपक पवार, उमेश कारेकर, शिव इरले, सुरेश चव्हाण, राजू कोलपटे, प्रथमेश काबदुळे, स्वप्नील चव्हाण, दीपक माने, पल्लवी चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुर्ये तर्फे देवळे गावातील व पुर्ये गावच्या प्रवेशद्वारावर काजळी नदीच्या लगत “आपले पुर्ये” हा विद्युत रोषणाइचा बोर्ड होता.
गावाची ओळख दाखवणाऱ्या या बोर्डाची अज्ञाताकडून मोडतोड करण्यात आली. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुर्ये दौऱ्याच्या वेळी स्वागतासाठी लावलेल्या फलकांची देखील मोडतोड करण्यात आली. दरम्यान याबाबतचे वृत्त साखरपा पोलिसांना समजताच साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार नितीन जाधव यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, हा प्रकार गावातील शांतता भंग पडावी या उद्देशाने करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेची कसून चौकशी करून आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.