रत्नागिरी शैक्षणिक गुणवत्त्ता आणि क्रीडा कौशल्यामध्ये कायमच उच्च स्थानी आहे. रत्नागिरीने अनेक खेळाडू तयार केले असून, अनेक जण राष्ट्रीय स्तरावर आपल्या रत्नागिरीचे नाव उंचावत आहेत. प्रत्येक खेळाडूची स्वतंत्र आवड असते. रत्नागिरीतील अनेक खेळाडू विविध खेळांमध्ये पारंगत असून विविध पारितोषिके मिळवलेली आहेत. मुलांच्या सोबतीने अनेक मुली सुद्धा विविध खेळांमध्ये आपली कुशलता दाखवत आहेत.
रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिअशन आणि आर्यन क्लबच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अर्जुन पुरस्कार विजेती, महाराष्ट्राची खो-खो पटू सारिका काळे-खोत हिचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू म्हणून नाव कमावलेली सारिका हिचा खेळातील प्रवास अत्यंत बिकट परिस्थितीमधून गेला आहे. पण फक्त मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आणि विशेष करून राज्य खो-खो संघटनेचे माजी सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने सारिका हिने उस्मानाबाद संघाकडून खेळून भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे.
फक्त आणि फक्त कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्राला खो-खो मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन, खूप मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्राच्या नावावर यशाची मोहोर उमटली.त्यामुळे रत्नागिरीमध्ये आलेल्या राष्ट्रीय खेळाडू सारिका काळे- खोत हिचा रत्नागिरीमधील क्रीडाप्रेमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. रत्नागिरीतील उदयोन्मुख खेळाडूंना चांगला खेळ खेळून मोठे होऊन रत्नागिरीचे नाव उज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रसंगी शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गुळवणी, क्रीडाधिकारी विशाल बोडके, सौ. नेत्रा राजेशिर्के, विनोद मयेकर, राजेश कळंबटे, राजेश चव्हाण, पंकज चवंडे, संध्या शितोळे ठरविक क्रीडापेमी उपस्थित होते. कोरोना काळातील नियमांचे पालन करून छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला.