शहरातील बहादूरशेखनाका येथील उड्डाणपूल, वाशिष्ठी नदीचा पुलाच्या कामाची त्वरित चौकशी करून महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अग्रीमा महिला संघाच्या प्रतिनिधींना दिले. अग्रीमा महिला संघाच्या जिल्हा प्रतिनिधींनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चिपळूण परिसरातील ६व्या टप्प्याच्या कामातील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी नागपूर येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महिला पदाधिकारी म्हणाल्या, महामार्ग कोकणवासियांचा जीवनाधार असून, महामार्गाचे काम अयोग्य पद्धतीने, संथगतीने व दर्जाहीन केले जात आहे.
वर्तमान व भविष्यातील धोके टाळावेत व महामार्गाचे काम उत्तम दर्जाचे व्हावे, जनतेच्या मनातील भीती व व्यथा दूर व्हाव्यात यासाठी आपण तातडीने आवश्यक ती कृती करावी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील १२ वर्षांपासून सुरू असून, यातून निर्माण होणाऱ्या रोजच्या समस्या व अपघात जनता सहन करत आहे; मात्र महामार्गाचे होणारे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. शासकीय पैशाचा अपव्यय होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उड्डाणपूल कोसळला. बहादूरशेख नाक्याजवळील वाशिष्ठी नदीवरील पुलाचे कामही सुमार दर्जाचे झाले आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या व चौकटी बाहेर आल्या असून, पुलाखालील भागात भेगा पडत आहेत. परशुराम घाटात रस्ता खचून त्यास भेगा पडल्या आहेत.
या घाटात पावसाळ्यात दरडी कोसळून रस्त्यावर येत असून वाहतुकीची कोंडी करत आहेत तसेच लोकांचे जीव घेत आहेत. या रस्त्यास जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम केल्यावर आठ ते पंधरा दिवसात पुन्हा हेच खड्डे पूर्वीपेक्षा मोठे होतात. यासाठी तज्ज्ञ समिती नेमून कामाची चौकशी व सुरक्षितता मुल्यांकन करण्यात यावे. कंत्राटदार व कामाचे मूल्यांकन, संनियंत्रण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अग्रीमा महिलासंघाच्या मुख्य निमंत्रक शामल कदम, निमंत्रक स्वाती साळवी, मानसी भोसले, मंजुषा साळवी, मिनल बांदेकर व मंडणगडच्या अंजली बैकर यांनी सहभाग घेतला.