महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन गोळप व फणसोप कार्यालयात झाले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने ग्रामीण भागातील महिलांना स्किल इंडिया आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत उच्च दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनसोबत सामंजस्य करार केला आहे. त्या अंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला फणसोप सरपंच राधिका साळवी, गोळप सरपंच जिगर पावसकर, गटविकास अधिकारी जाधव, रिसोर्स मोबिलायझेशन युवा परिवर्तनच्या प्रमुख अपर्णा चाळके, संचालक (तांत्रिक) सौम्या चक्रवर्ती, सागर चिवटे आणि फिनोलेक्स इंडस्ट्रिजचे अभिषेक साळवी आणि किरण चौगुले उपस्थित होते. फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्र २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. यामध्ये आजपर्यंत ५०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन आणि खेरवाडी असोसिएशनच्या महिला आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा एक नवीन उपक्रम आहे. सर्व सात ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी हा अभ्यासक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंग आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनीही शुभेच्छा दिल्या. मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती रितू प्रकाश छाब्रिया यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
हे अभ्यासक्रम होणार सुरू – या कौशल्य विकास केंद्रांतर्गत भाट्ये, फणसोप, कोळंबे, गोळप, पावस, पूर्णगड आणि शिरगाव या सात गावांमध्ये नर्सिंग सहाय्यक, ब्युटिशियन, बॅग मेकिंग, केटरिंग, प्लम्बिंग, वायरमन, भाजीपाला शेती असे विविध अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. खेरवाडी असोसिएशन व मुकुल माधव फाउंडेशन २०१७ पासून पालघर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्वच्छता, जलसंधारण, महिला सशक्तीकारण, चेन्नई, तामिळनाडूमध्ये ३ गावे दत्तक घेऊन समाजविकास कार्य करत आहे.