शहर आणि परिसरात अंमली पदार्थाचे खुलेआमपणे सेवन केले जात आहे. शहरातील विरेश्वर कॉलनी येथील नव्याने काम सुरू असलेल्या एका इमारतीत ४ तरूणांना गांजाचे सेवन करताना नागरिकांनी रंगेहात पकडले. हे चारही तरूण झिंगलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी या चारही तरूणांना ताब्यात घेतले असून गांजा सेवन केलेल्या तरूणाने शहरातील एका बॉडीबिल्डरचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. तर चिपळूण पोलिसांनी अमली पदार्थाचे रॅकेट उद्वस्थ न केल्यास पोलिस स्थानकावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार रमेश कदम यांनी दिला आहे. ड्रज हा विषय संपूर्ण राज्यात गाजत आहे.
या संदर्भात विरोधकांनी राळ उठवली असून तरुण पिढी बरबाद होत असल्याचा आरोप करत राज्याच्या गृहमंत्र्यांना अडचणीत आणले आहे. अशा परिस्थितीत चिपळूणमध्ये देखील गेले अनेक वर्षांपासून याबाबत खुलेआम चर्चा सुरू आहे. शहरात सातत्याने अमली पदार्थांचा पुरवठा आणि त्याचे सेवन करणाऱ्या घटना घडत आहेत. काही महिन्यापुर्वी अमली पदार्थाचे सेवन केलेल्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. “शहरातील विरेश्वर कॉलनी येथे एका गृहसंकुलाचे बांधकाम सुरू आहे. गेली दोन तिन महिने या इमारतीचे बांधकाम बंद आहे. याच इमारतीत काही तरूण येत असल्याची चर्चा होती. त्यानुसार काही लोकांनी बुधवारी सकाळपासूनच पाळत ठेवली होती.
इमारतीच्या बाजूलाच दुचाकी पार्किंग करून हे तरूण इमारतीत गेले. तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत टेबल लावून गांजाचे सेवन सुरू केले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या लोकांनी या चारही तरूणांना ताब्यात घेतले. त्यावेळी हे तरूण नशेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पोलिस दाखल होताच त्यांना ताब्यात घेतले. या तरूणांकडे चौकशी करताना शहरातील एका बॉडीबिल्डरकडून गांजा घेत असल्याचे सांगितले. या चार तरुणांपैकी एकजण कापरे येथील असून उर्वरीत तिघेजण शहरातीलच आहेत असे पोलीसांनी पत्रकाराना माहिती देताना सांगितले. कापरे येथील या तरूणास यापुर्वी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात ताब्यात घेतले होते.
यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले माजी आमदार रमेश कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येथील तरूणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे. गांजासह अमली पदार्थ सहजरित्या उपलब्ध होत असल्याने त्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पोलिस यंत्रणेने याची पाळेमुळे खणून काढायला हवीत. गांजासह अमली पदार्थाचे पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. येत्या पाच दिवसात या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास पोलिस स्थानकावर सर्वपक्षीय मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला आहे. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव संतोष नलावडे, माजी नगरसेवक राजेश कदम, श्रीनाथ खेडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान पोलिसांनी देखील हा विषय गांभीर्याने घेतला असून पोलिसांची एक टीम सायंकाळी उशीरा घटनास्थळी पोहचली होती. त्यांनी संबधितांचे जाबजबाब घेऊन पंचनामा देखील केला आहे. तसेच त्या तरुणांच्या पालकांना देखील पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले असून कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थाची पाळेमुळे उखडून काढल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या बाबत लवकरच शहरात बैठक होणार असून त्या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार आहे.