पावसाळा सुरु झाला कि, विजेचा लपंडाव सुरूच असतो. शनिवारपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती उद्भवली असून, अनेक ठिकाणची बत्ती गुल झालेली दिसली. मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील मोसम या गावामध्ये पूर आला. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीज वाहिनीमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या. त्यामुळे तेथील वीज पुरवठा खंडित करुन पुढील दुरुस्तीचे काम करणे सुरू होते. सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत, मोसम गावाला पूराचा वेढा बसल्याने, जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे, त्या बनवाडीतील खांबानजीकचे पाणी फूटभर तरी वर चढले होते.
मात्र तिथल्या रुपेश महाडिक या महावितरणच्या कर्मचाऱ्याने छातीपर्यंतच्या पाण्यातून जाऊन तिथल्या त्या खांबावरचा खटका सुरु केला आणि पुढच्या सर्व गावामध्ये वीज आली. एरव्ही काही कामासाठी जरी वीज पुरवठा खंडित झाला तर, महावितरणाच्या नावाने लाखोली वाहायला सुरुवात केली जाते. पण पावसा-पाण्यातून त्यांचे सुरु असलेले त्यांचे काम किती जिकरीचे आहे, याचा अंदाजही आपल्याला असतो.
धुवांधार पावसामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी नद्यांची पातळी ओलांडून पूर आला. मोसम गावात पुराच्या छातीपर्यंतच्या पाण्यातून चालत, तर काही अंतर पोहत जाऊन, जीवाची पर्वा न करता, केवळ आजूबाजूच्या गावामध्ये वीज यावी यासाठी महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रुपेश महाडिक, दर्शन जोगले या दोघांनी पाण्यातून जाऊन खटका सुरु करण्याचे धाडस दाखविले. रुपेश महाडिक छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत गेला आणि त्याने खटका सुरू केल्याने मोसम सह पुढची गावे प्रकाशमान झाली. त्यांच्या या साहसाचे कौतुक आणि चर्चा सर्वत्र होत आहे. कामाप्रती असलेला प्रामणिकपणा यातून सहज दिसतो आहे.