28.4 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriजयगड, दाभोळ खाडीत हाउस बोटिंग जिल्हा परिषदेचा प्रस्ताव

जयगड, दाभोळ खाडीत हाउस बोटिंग जिल्हा परिषदेचा प्रस्ताव

डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते.

पर्यटनाला चालना देतानाच महिलांना रोजगारसंधी देण्यासाठी केरळच्या धर्तीवर जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाउस बोटिंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सिंधू-रत्न योजनेत दोन कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. बोटी महिला बचतगट चालवणार आहेत. जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाउस बोटिंगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे.

महिला बचतगटांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे. यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी आहेत. त्याचा वापर हाउस बोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु- रत्न योजनेतून निधी मिळणार आहे.

दोन्ही खाडीत काय पाहता येईल? वेलदूर ते चिपळूण (३० ते ४० किलोमीटर) – कांदळवन दर्शन, मगरसफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, डॉल्फिन दर्शन.

जयगड ते तवसाळ-भातगाव पूल (२२ किलोमीटर) – कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन, मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, पुरातन मंदिरे, कोकणकलांचे दर्शन, बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्र.

RELATED ARTICLES

Most Popular