29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeChiplunराजकीय चक्रव्यूहात अडकले सदानंद चव्हाण

राजकीय चक्रव्यूहात अडकले सदानंद चव्हाण

सरकारमध्ये सामील झाल्यामुळे सदानंद चव्हाण यांना मतदार संघातील विकासकामांसाठी निधी मिळू लागला.

सव्वा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि राज्यात महायुतीची सत्ता आली. त्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले. त्यात राजकीय भवितव्याचाही विचार होताच; मात्र ठाकरे शिवसेना सोडल्यानंतर चव्हाण सध्या राजकीय चक्रव्यूहात अडकल्याचेच दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर निकम यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपकडे तगडा उमेदवार नव्हता.

शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणुकीला सामोरे गेले तर चिपळूण मतदार संघातून सदानंद चव्हाण यांचा सक्षम पर्याय शिंदे गट आणि भाजपसमोर होता. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम कसे करू, अशी सल सदानंद चव्हाण यांना होतीच; परंतु त्यांनी ती कधी बोलून दाखवली नाही. चव्हाण यांनी मागील दोन निवडणुकांमध्ये स्वतःची सर्व ताकद पणाला लावली होती. त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती; पण भाजपने आर्थिक रसद पुरवली आणि सर्व ताकद आपल्यामागे उभी केली तर भावनिक वातावरण तयार करून आपण तिसरी निवडणूक जिंकू शकतो, असा अंदाज बांधून चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेताना चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार संघाचा विकास आणि हिंदुत्वाचा आधार घेतला. महायुती सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. सरकारमध्ये सामील झाल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सदानंद चव्हाण यांना मतदार संघातील विकासकामांसाठी निधी मिळू लागला. सत्ता गेल्यामुळे आमदार शेखर निकम यांना निधी आणताना मर्यादा आल्या; परंतु हक्काचा आमदार निधीसह विविध योजनांच्या माध्यमातून ते कार्यरत होते. चव्हाण आणि निकम यांच्यात निधी आणण्यावरून वर्षभर चढाओढ सुरूच होती.

सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार विनायक राऊत, माजी खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेत शिवसेनेतील गळती थांबवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात बैठका घेतल्यानंतर अनंत गीते चिपळूणकडे फिरकले नाहीत. गावोगावी बैठका घेत नेत्यांनी ठाकरे शिवसेनेतील पडझड वाचवण्याचा प्रयत्न केला. सव्वा वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर सत्तेत सामील झाला. त्यात आमदार शेखर निकम सत्तेबरोबर राहिले. तिथेच चिपळूणमधील राजकीय गणिते बिघडली आहेत. त्यामुळे शिवसेना सोडून बाहेर पडलेले सदानंद चव्हाण व त्यांच्या समर्थकांची पुन्हा अडचण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular