चिपळूणात गांजा प्रकरणी पोलिसांची धरपकड सुरू आहे. आतापर्यंत चिपळूण पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून गांजा विक्रेता बॉडीबिल्डर अमर चंद्रकांत लटके याला पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर आणखी एकाला अटक करण्यात आली असून ही साखळी दिवसेंदिवस वाढत निघाली आहे. चिपळूणात ४ तरूण गांजा ओढताना विरेश्वर कलनी नजिक सापडले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. या तरूणांनी आपण गांजा संशयीत आरोपी अमर लटके यांच्याकडून आणल्याचे सांगितल्यानंतर जिम व्यावसायीक बॉडीबिल्डर अमर लटके याला अटक झाली. यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी १ मिळाली व त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
मात्र याच दरम्यान धरपकड सुरू असताना संशयीत आरोपी विजय शांताराम राणे (५६, मुरादपूर भोईवाडी), ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव कुंभारवाडी) यांना गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमर लटके याच्याकडून ८ दिवसांपुर्वी गांजा खरेदी केल्याचे सांगितले. यानंतर जामिनावर सुटलेला अमर लटके याला पुन्हा सोमवारी सायंकाळी ४ वाजता ताब्यात घेऊन अटक केली असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले. याशिवाय रविवारी रात्री शहरात गस्त सुरू असताना अमीर उमर शेख (२३, मुरादपूर मिठागरी मोहल्ला) याला गांजा सेवन प्रकरणी अटक केली आहे.