रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आम. राजन साळवी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राजापूर तालुक्याच्या आढावा सभेत पेंडिंग आणि भविष्यातील करण्यात येणाऱ्या विकास कामांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी रत्नागिरी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी प्रत्यक्ष गावोगावी जाऊन बैठका घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन जास्तीत जास्तीत विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कोरोना काळामध्ये अनेक शाळांची डागडुजी करण्याचे काम पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे राजापूर तालुक्यातील शाळा दुरुस्ती करण्यासाठी शासकीय निधीची वाट न पाहता मनरेगा अंतर्गत शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी झिरो पेंडसी व डेली डिस्पोजल कामाची पध्दत अवलंबणे गरजेचे आहे.
मनरेगा अंतर्गत २६२ प्रकारची कामे घेण्यात येतात. त्यानुसार जनावरांसाठी पक्क्या बांधकामाचे गोठे बांधणे, बाजार कट्टे, बचत गट शेड, ग्रामपंचायत कार्यालय उभारणी, शाळा दुरुस्ती आदी कामे करण्यात यावी. क वर्ग पर्यटन व ग्रामीण यात्रास्थळ योजने अंतर्गत पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी जास्तीत जास्त कामाचे प्रस्ताव जिल्हास्तरावर सादर करण्यात यावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे घेऊन जास्तीत जास्त जॉबकार्ड बनविण्याची कार्यवाही त्वरेने करावी.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे संक्रमण थोपवण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला आधीच रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा अध्यक्षांनी घेतला. ग्रामीण भागामध्ये रुग्ण जास्त प्रमाणात आढळू लागल्याने, लसीकरणाचा वेग वाढवून गावपातळीवर लसीकरण १००% पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.