आयआरसीटीसी आरक्षण प्रणालीमध्ये आता दिवा स्थानकाचा समावेश मुंबई विभागात करण्यात आल्याने आरक्षण प्रणालीचा वापर करणाऱ्यांना आता दिवा रेल्वे स्थानकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. संकेतस्थळावर बदल झाला असून रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. एकच उपनगरीय विभाग असल्यामुळे आरक्षण प्रणालीत किंवा IRCTC वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, वांद्रे टर्मिनस, वसई, कल्याण यांसारख्या मुंबई विभागातील स्थानकांतून गाड्या शोधल्यास संबंधित स्थानकावर गाडी थांबत नसल्यास जवळील स्थानकांवरून किंवा गाडी सुटण्याच्या सुरवातीच्या स्थानकावरून गाड्या दाखवल्या जातात.
कल्याण ते माणगावसाठी गाड्या शोधल्यास नागपूर- मडगाव एक्स्प्रेस कल्याण येथून तर तुतारी एक्स्प्रेस कल्याणवरून जात नसल्यामुळे दादरपासून दाखवली जाते. त्यात दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस पकडण्यासाठी कल्याणवरून दिवा जवळ असले तरीही ती पनवेलपासून दाखवली जाते. त्यामुळे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस पनवेलवरूनच सोडली जाते की काय, असा प्रवाशांचा गैरसमज होत असे.
प्रवाशांना दिलासा – कदाचित दिव्यावरून एकच गाडी असल्यामुळे दिव्याचा समावेश मुंबई विभागात करणे राहून गेले होते. याबाबत २५ ऑक्टोबर २०२३ ला ई-मेल व सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीच्या माध्यमातून महापदी यांनी ही बाब मध्यरेल्वेच्या लक्षात आणून दिली. संबंधित विभागाने ती तक्रार तातडीने २७ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली. त्यानुसार रेल्वेने सकारात्मक कार्यवाही करत २ नोव्हेंबरपासून मुंबईतील स्थानकांवरून गाडी शोधल्यास दिवा-सावंतवाडी दिवा एक्स्प्रेसचे सुरवातीचे व शेवटचे स्थानक दिवा दाखवले जात आहे. त्यामुळे भविष्यात प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.