कमळ या चिन्हावर आम्हाला लोकसभेचा भाजपचा खासदार निवडून आणायचा आहे, असा निर्धार आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा कोणाच्या वाटेला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाने ही जागा घेतली तर पक्षश्रेष्ठी कार्यकत्यांची समजूत कशी काढणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लोकसभा रत्नागिरी-सिंधुदुर्ग निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढवण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे. मात्र, भाजपचा उमेदवार नेमका कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे.
त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. ज्या मतदार संघात भाजपने कधीच लोकसभेची निवडणूक लढवली नाही; पण तेथे भाजपला सकारात्मक वातावरण आहे, अशा मतदार संघांचे सर्वेक्षण होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १६ मतदार संघ असून त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जबाबदारी मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्याकडे तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. मागील वर्षभरात या मंत्र्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दौरा करत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले.
त्यामुळे येथे भाजप लोकसभा निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढवेल, अशी चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपने कधीही जिंकला नाही; मात्र या वेळी आम्हाला भाजपचा उमेदवार निवडून आणायचा आहे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते सामान्य लोकांशी चर्चा करताना इच्छा बोलून दाखवत आहेत. ही जागा भाजपने शिवसेनेला सोडली, तर पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांची समजूत कशी काढतील, असा प्रश्न आहे. भाजपकडून उमेदवार कोण असेल, याबद्दलही चर्चा सुरू आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांचे नाव सुरवातीपासून पुढे होते; मात्र माजी खासदार नीलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी काढलेल्या रत्नागिरी दौऱ्यामुळे त्यांचे नावही लोकसभेसाठी चर्चेत आले.
दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत हे सध्या महायुतीत आहेत. त्यामुळे जर लोकसभा निवडणूक महायुती म्हणून लढली गेली तर पालकमंत्री सामंत यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यांचे भाऊ किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक असल्यामुळे भाजपकडून कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.