पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई अत्यंत गुप्तपणे आणि दोन टप्प्यांत करण्यात आली.
-
पहिला टप्पा (जमीनी कारवाई): सर्वप्रथम अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात गुप्त माहितीच्या आधारे लष्कराने जमिनीवर मोहीम राबवली. या चकमकीत मुख्य टीटीपी कमांडर खान फरोशसह ४ दहशतवादी मारले गेले.
-
दुसरा टप्पा (हवाई आणि सीमापार हल्ले): यानंतर पाकिस्तानी सैन्याने थेट सीमा ओलांडून अफगाणिस्तानच्या हद्दीत असलेल्या पक्तिया, पक्तिका आणि कुनार या तीन प्रांतांमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले. या तळांवर झालेल्या बॉम्बवर्षावात आणखी २५ दहशतवादी जागीच ठार झाले, तसेच त्यांचा मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला.
कराची हल्ल्याचा घेतला बदला
या कारवाईच्या अवघ्या एक दिवसापूर्वी म्हणजेच शनिवारी, पाकिस्तानच्या कराची शहरात ‘सिंध रेंजर्स’च्या प्रादेशिक मुख्यालयावर दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटकांसह आत्मघातकी हल्ला केला होता. या भीषण चकमकीत रेंजर्सचे जवान शहीद झाले होते, तर प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी ६ हल्लेखोरांना मारले होते. या कराची हल्ल्याची जबाबदारी टीटीपीमधून फुटून निघालेल्या ‘जमात-उल-अहरार’ या संघटनेने घेतली होती. याच हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानने ही तातडीची आणि मोठी लष्करी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या सीमापार कारवाईवर अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

