कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये लहान मुलांवर होणार असल्याने राज्याने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेला आधीच थोपवण्यासाठी पूर्वनियोजन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या सर्वच संभाव्य आजारांवर औषध आणि लसीकरण करण्याकडे पालक आणि आरोग्य यंत्रणा सजक झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिलन लसीकरण कार्यक्रमाची सभा जि.प.सीईओ डॉ.इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्ह्यामध्ये न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिलनचा लसीकरण अंतर्गत नियमित लसीकरणामध्ये समावेश करण्यात येत असून, ही लस न्यूमोकोकस या जीवाणूमुळे होणाऱ्या न्युमोनिया आणि मेनिजायटिसपासून आजारापसून लहान मुलांचे संरक्षण करेल. न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिलन लस ही अतिशय सुरक्षित लस असून ६ आठवडे ते १४ आठवडे आणि ९ महिन्यांपर्यंतच्या बालकांना या लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत.
लहान मुलांच्या इतर कोणत्याही लसीप्रमाणेच त्याचे परिणाम दिसून येतात, ही लस दिल्यावर मुलांना सौम्य ताप येऊ शकतो किंवा इंजेक्शन टोचलेली जागा सूज आल्यासारखी वाटून, थोडी लालसर होऊ शकते. जेव्हा तुमच्या बालकाला पीसीव्ही लस देण्यात येईल त्याचवेळी वेळापत्रकानुसार लागू असलेल्या अन्य लसी देखील देण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पीसीव्ही लसीचे एकुण ११०० डोस प्राप्त झाले असून त्याचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करण्यात आल्याचे डॉ.श्री.अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले. पीसीव्ही ही देण्यात येणारी लस विनामुल्य असल्याचे सांगून नागरिकांनी आपल्या बालकांना देण्याचे आवाहन केले. डॉ. इंदुराणी जाखड यांनी पीसीव्ही लस आजपासून नियमीत लसीकरणामध्ये समावेश करण्यात येत असल्याचे सांगितले.