रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील महिन्यांपासून अनेक लहान मोठ्या चोरी, घरफोडीची प्रकरणे समोर येत आहेत. मागील बराच काळ रत्नागिरी पोलिसांच्या सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेमुळे रत्नागिरी मधून गुन्हेगारी वृत्ती हद्दपार झाली होती, परंतु, आत्ता कोरोना काळामध्ये पुन्हा अशा गुन्ह्यांनी डोके वर काढले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील डावखोल येथील रहिवाशी जयेश पालांडे व त्यांची आई अनिता पालांडे या रात्री ८ ते १०.३० या वेळेत शेजारी कार्यक्रमानिमित्त कारकर यांच्या घरी जेवायला गेल्या होत्या. पालांडे यांच्या घरीच कोणी नसल्याच्या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि घराच्या पुढील दरवाजाचे कुलुप हत्याराने उचकटून चोरट्यांनी आतल्या खोलीतील गोदरेज कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ६० हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. जयेश पालांडे रात्री पुन्हा घरी आले असता, त्यांच्या चोरीचा सर्व प्रकार निदर्शनास आला.
सदर चोरी प्रकरणी, पालांडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असता, घटनास्थळी चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञ यांना शुक्रवारी पाचारण करण्यात आले होते. श्वानाने चोरट्याचा अचूक माग काढत स्थानिक रुपेश शिंदे याच्या इथपर्यंत येऊन घुटमळला. त्यामुळे पोलिसांचा संशय रुपेश शिंदेवर बळावला. पालांडे जिथे शेजारी जेवायला गेले होतेत, जेवण्याच्या कार्यक्रमावेळी रूपेश शिंदे हा उशीरा दाखल झाला होता. यामुळे पोलीसांचा संशय त्याच्यावर बळावला. तपास मोहिम सुरू असताना गुरूवारी रूपेश याने चोरीची कबुली दिली.
त्यामुळे ७२ तासामध्ये संगमेश्वर तालुक्यातील डावखोल कठेवठार येथे घरफोडी प्रकरणी पोलिसानी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदरची घरफोडी स्थानिक तरूणाने केल्याचे निष्पन्न झाले असून, संशयित रूपेश अरविंद शिंदे या आरोपीला अटक करून शुक्रवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी १९ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पोलिसांच्या या कर्तव्य तत्परतेने ७२ तासामध्ये आरोपीला गजाआड करता आले.