ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना पालवी आली होती. उवीरेत १५ टक्के झाडांवर काहींना मोहोर येण्याची स्थिती आहे. त्यावर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणीचा खर्च करावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्यात गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. हलका पाऊस झाल्याने हा फटका बसला आहे. सध्या बागायतदारांना थंडीची प्रतीक्षा आहे. यंदा पावसाने लवकर विश्रांती घेतली होती. त्यामुळे मुळांना ताण बसला. पालवी फुटलेल्या झाडांवर फवारणी केलेली नाही. त्या झाडांना डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोर येण्याची शक्यता आहे.
पालवी लवकर जून होण्यासाठी बागायतदार औषधांचा मारा करतात. ते साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिले जाईल. या वेळी थंडी पडणे आवश्यक आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कीडरोगांवर लक्ष ठेवावे लागत आहे. जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीत कैरी तयार होण्याची शक्यता आहे. काही झाडांना डिसेंबर महिन्यात कैरी लागेल. त्याची काळजी घेण्यासाठी झाडांना पाणी दिले जाते. त्यावर औषध फवारणीही केली जाते. हा आंबा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस काढणीयोग्य होईल, असा अंदाज आहे.