मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील ११ केव्ही असलेल्या लाईनचे दोन खांब पूर्णपणे गंजले असून ते कधीही कोसळू शकतात. यामुळे हे खांब बदलण्याची मागणी गेले दहा वर्षे बागायतदार महेंद्र आरेकर करत आहेत, मात्र महावितरण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. या खांबामुळे आधीच सुपारी, काजूचे बागायतीचे नुकसान झाले आहे. आरेकर यांच्या १२ एकर बागेत नारळ, सुपारी व काजू बागायत आहे. यामुळे येथे कामगारांची वर्दळ पाणी खत घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात असते. या बागायतीमध्ये ११ केव्ही महावितरणची वाहिनी गेलेली आहे.
या वाहिनीमध्ये चार खांब गंजलेले असून त्यातील दोन खांब पूर्ण गंजलेले असून निव्वळ वाहिन्यांवर हे खांब उभे आहेत. हे बदलण्याची मागणी गेली दहा वर्षे महावितरण कार्यालयात प्रत्यक्ष भेटून व लेखी केली जात आहे, परंतु महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या या बागायतीमध्ये ११ केव्हीची वाहिनी सुमारे चार एकरच्या परिसरातून गेली आहे. त्यामुळे या बागेतील सुपारीची झाडे यापूर्वी जळली आहेत. हे खांब बदलण्यासाठी त्यांनी गुहागर, चिपळूण व रत्नागिरी या महावितरणच्या तिन्ही कार्यालयात लेखी पाठपुरावा केला आहे. परंतु आश्वासनाव्यतिरिक्त महावितरणने काहीच केलेले नाही.
मोठी दुर्घटना घडण्या अगोदर याबाबत महावितरणने कार्यवाही करावी अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे. खराब खांब तातडीने बदला गुहागर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बागायतदार आहेत. त्यांचे आंबा, नारळ, सुपारी, काजू हिच प्रमुख उत्पादने आहेत. या भागातून मोठ्या प्रमाणावर विद्युत वाहन्या गेल्या आहेत. दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास हातातोंडाशी आलेले उत्पादनावर पाणी सोडावे लागते. महावितरणने या विद्युत वाहिन्या पेलणारे खांब सध्या कोणत्या स्थितीत आहेत. याची पाहणी करू आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बागायतदारांसह सर्वसामान्यांतून होत आहे.