कोकणातील माकडांचा उच्छाद थांबवण्यासाठी माकडांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. त्याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर कोकणातील माकडांचा बंदोबस्त होणार आहे. त्यासाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी दिली. कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये माकड व वानरांचा उच्छाद प्रचंड वाढला आहे. आंब्यापासून भाजीपाल्याचे अतोनात नुकसान करणाऱ्या कोकणातील माकडांचा-वानरांच्या उच्छादावर कायमस्वरूपी तोडगा करण्याची मागणी सुरू होती.
हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला, तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीचे नुकसान झाले, तर नुकसानभरपाईही मिळत नाही कारण, नक्की कशामुळे नुकसान दाखवणे हे सरकारी यंत्रणेला पटवून देणे अशक्यप्राय होते. या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणात अनेक आंदोलने झाली; मात्र त्यातून मार्ग निघालेले नाहीत. त्यामुळे माकडांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.