भारतात सर्वत्र बुधवार दि. २१ जुलै रोजी ईद-ऊल-अजहा साजरी केली जाणार आहे. आखाती प्रदेशमध्ये एक दिवस आधी म्हणजे आज मंगळवारी ईदीचा सण साजरा करण्यात येत आहे. इस्लाम धर्माच्या पाच प्रमुख्य तत्वांपैकी एक असते हजयात्रा. आयुष्यात एकदा तरी मक्का मदिना येथे जाऊन हजयात्रा पूर्ण करण्याचे प्रत्येकाची इच्छा असते. हजयात्रेसाठी आपल्या जमापुंजी मधून काही हिस्सा वेगळा काढून ठेवला जातो. ज्यांना ज्यांना हज यात्रेला जायचे आहे, ते आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार मिळणाऱ्या मिळकतीचे ४ हिस्से करतात आणि ज्या धर्माच्या जकात(दान), कुर्बानी, सदका (गरिबांना दान करणे) आणि हज यात्रा या ४ गोष्टी केल्याच पाहिजेत यासाठी त्याचा वापर करतात.
हज यात्रेसाठी साधारण सव्वा महिन्याचा कालावधी लागतो. परंतु, मागील वर्षीप्रमाणे कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे, यावर्षीही हजयात्रा रद्द करण्यात आली. पवित्र मक्का मदिना हज यात्रेकरूंसाठी बंद ठेवण्यात आले. कोरोनाचा देशातील प्रादुर्भाव पाहता, हजयात्रा कोरोना स्प्रेडर ठरू नये यासाठी कमिटीने यावर्षी सुद्धा यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बकरी ईद आखाती प्रदेशात आज मंगळवारी साजरी करण्यात येणार असून, भारतात सर्वत्र ईद बुधवारी साजरी करण्यात येणार असल्याने मुस्लिम भाविक मंगळवारी ‘आरफत’चा रोजा ठेवणार आहेत.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे, सोशल डिस्टन्सिंगमुळे ईद-उल-अजहाची नमाज रमजान ईदप्रमाणे घरीच अदा करण्यात येणार आहे. मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याची प्रथा असून, ईदपासून पुढे दोन दिवस कुर्बानी देण्यात येते. कोरोनाचे नियम पाळूनच कुर्बानीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी रत्नागिरी शहर परिसर शिवखोल, कोकणनगर, मिरकरवाडा आदी ठिकाणी पोलिसांमार्फत रूट मार्च करण्यात आले असून, सोशल डिस्टन्सिंग राखूनच ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.