शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत बऱ्याच दिवसांनी एकत्र आले. या वेळी दोन्ही पक्षांचे इकडेतिकडे असलेले पदाधिकारी समोरासमोर आले आणि त्यातून काही किस्से घडले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित खासदार विनायक राऊत यांच्या पाया पडले. तेव्हा राऊत म्हणाले, ‘राहुल लवकरच तुला प्रतिनियुक्तीवर घेतो. उदय सामंत यांनी हजरजबाबीप्रमाणे त्याला लगेच उत्तर दिले. साहेब, तुम्ही राहुलला घ्या, मी तुमच्या काहीजणांना माझ्याबरोबर घेतो. दोघांच्या या टोलेबाजीने एकच हशा पिकला.’ कोकण विभागीय क्रीडास्पर्धेचा आज शुभारंभ झाला. या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यासह महसूलचे वरिष्ठ अधिकारी शासकीय विश्रामगृहात एकत्र दिसले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर विनायक राऊत आणि उदय सामंत यांच्यातून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती आहे. संधी मिळाली की, दोन्ही नेते आपल्या पक्षाची बाजू भक्कम मांडतात. अनेकवेळा वैयक्तिक टीकेवर हे विषय येतात. त्यामुळे उदय सामंत आणि विनायक राऊत एकत्र दिसतील, असे अपेक्षित नव्हते; परंतु महसूलच्या क्रीडा स्पर्धांमुळे हे आज घडले. दोघांना विश्रामगृहात आजुबाजूच्या खुर्चीवर बसल्याचे पाहून पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. आमचे वैचारिक मतभेद आहेत; परंतु आम्ही चांगले मित्र आहोत. महसूल विभाहाच्या स्पर्धेनिमित्त त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे दोघांनीही सांगितले.
त्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघेही उठून निघाले. तेवढ्यात खासदार राऊत यांचे निकटवर्तीय आणि माजी स्वीय सहायक राहुल पंडित तिथे आले. राऊत यांना पाहिल्यानंतर त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनीही त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि पटकन म्हणाले, राहुल तुला लवकरच प्रतिनियुक्तीवर माझ्याकडे घेतो; परंतु उदय सामंत यावर बोलणार नाही, असे होणारच नाही. त्यांच्यातील हजरजबाबीपणा जागा झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, राऊत साहेब तुम्ही राहुलला घ्या, मी तुमच्याबरोबर असणाऱ्यांना घेतो.