रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव हे मंडणगड तालुक्याच्या दौर्यावर असताना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यावेळी त्यांनी झीरो पेंडन्सी, मनरेगा, जलजीवन मिशन, संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी आणि विकासकामांचे प्रश्न यावर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, आमदार योगेश कदम, सभापती स्नेहल सकपाळ आदी उपस्थित होते. त्यांनी पुढे सांगितले की, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी ठराविक वेळेत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे.
मागील वर्षी पासून अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन, कोरोनाचा वाढता प्रसार यामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावली आहे, तिला पुन्हा अधिक वेगवान करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम पद्धती राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष फिरून, प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत, प्रशासनास योग्य सूचना दिलेल्या असल्याची माहिती दिली. पत्रकारांनी असमतोल निधी वाटप झाल्याने तालुक्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत विचारले असता, ते म्हणाले की निधीचा अभाव व सर्वांना समान न्याय देण्याची भूमिकेबद्द्ल तटस्थ आहे आणि येत्या काळामध्ये तालुक्यास भरीव निधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील असल्याचे त्यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे, मनरेगा अंतर्गत २६२ प्रकारची कामे करण्याची परवानगी असल्याने, जास्तीत जास्त कामे या योजने अंतर्गत करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. कोणत्याही कामाची पुर्तता करायची असेल तर, पाठपुरावा करण्याची सवय प्रत्येकाने लावून घ्या, आणि तरीही विकासकामांमध्ये दुर्लक्ष केले जात असेल तर त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.