हापूस आंब्यापाठोपाठ काजू पिकाला पावस परिसरामध्ये सुरवात झाली आहे. ओल्या काजूगराला चांगली मागणी आहे. १६०० रुपये शेकडा दराने ओले काजूगर विकले जात असल्याने अनेक बागायतदारांनी काजूची लागवड करण्यास सुरवात केली आहे. पावस परिसरामध्ये हापूस आंब्याच्या निर्यातीला सुरवात झाली आहे. त्या पाठोपाठ काजूचे पीक भरू लागले आहे. ज्याप्रमाणे हापूस आंब्याला दर चांगला मिळत आहे, त्याप्रमाणे काजूच्या ओल्या गरांना चांगली मागणी वाढू लागल्याने सध्या १६०० रुपये शेकडा दर मिळत आहे. भविष्यात आदर कमी जास्त होऊ शकतो, परंतु वानर, माकडांच्या अतिरिक्त वावरामुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या शेतकरी या प्राण्यांपासून वाचवण्यात प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून उर्वरित पीक व्यवस्थितरीत्या हाती येईल. यासंदर्भात मावळंगे येथील शेतकरी अनिल बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्वतःची जवळपास दोनशे आंबा कलमे आहेत. परंतू कोकण कृषी विद्यापीठ शेतकर्यांनी वेळोवेळी मागणी करूनही थ्रीप्स व तुडतुडे यावर प्रभावी औषध देऊ शकलेले नाही जी औषध मिळतात ती सामान्य शेतकऱ्याला न परवडणारी आहेत. म्हणून अनेक आंबा बागा मोहर येऊनही ओसाड दिसत आहेत.
या बागायतदारांसमोर माकड, वानरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून आम्ही शिल्लक जमिनीवर सुमारे पन्नास काजू कलम लावली आहेत. त्यातून आता उत्पादनाला सुरवात झाली आहे. काजू बी तयार होऊन ती बाजारात विकणे न परवडणारे आहे. तोपर्यंत दर घसरलेले असतात. त्यामुळे ओले काजूगर विकणे परवडते. मेहनत घेऊन ओला काजूगर काढून विकला तर उत्तम दर मिळतो. त्याला चांगली मागणी आहे.