जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी शहरामध्ये उभारलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि विठ्ठलाच्या मूर्तीचे लोकार्पण कार्यक्रम पुढील दोन दिवसांत होणार आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखांहून वाढावी, असा याचा उद्देश आहे. लवकरच प्राणी संग्रहालयाचे स्वप्नही पूर्ण होणार असून, कंपाऊंडसाठी एमआयडीसीने १० कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मंत्री सामंत म्हणाले, शहरातील थिबापॅलेस येथील जिजामाता उद्यानात उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी (ता. ४) लोकार्पण होत आहे.
या वेळी स्वप्नील बांदोडकर यांचा कार्यक्रम होणार आहे. जिजामाता उद्यानात मंगळवार ते गुरुवार असा तीन दिवस मोफत प्रवेश दिला जाईल. त्यानंतर पुढे सध्याच्या तिकिटदरामध्ये प्रवेश असेल. जिल्हावासीयांचे प्राणीसंग्रहालयाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी एमआयडीसीने १० कोटी रुपये दिले आहेत. प्राणी संग्रहालयाच्या कंपाउंडचे काम जिल्हा परिषदेमार्फत केले जाणार आहे. त्याला एमआयडीसीच्या फंडातून निधी दिला जाईल. पुढे दिलेला निधी जिल्हा परिषद परत करणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये विविध कामे सुरू आहेत. थिबापॅलेस येथील जिजामाता उद्यानातील पुतळ्याच्या पायथ्यामध्ये अॅक्वारिअम उभारण्याचा विचार होता; मात्र ती जागा अपुरी आहे. त्यामुळे नवीन जागेत अॅक्वारिअम उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याऐवजी थ्रीडी शोसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी आधीच वर्ग केला आहे. शहरातील खाऊगल्लीसाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला असून, त्याचे कामही सुरू आहे.