वारकरी संप्रदायाला राजाश्रय मिळाला पाहिजे म्हणून वारकरी साहित्य परिषद आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढची ५ वर्षे दहा १० लाख रुपये, त्यापुढील १० वर्षे १५ लाख रुपये दिले जातील. तसा ठराव एमआयडीसीच्या बैठकीत केला जाईल; पण पुढील वर्षी देखील रत्नागिरीत संत साहित्य संमेलन घ्यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात १२व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने आज रत्नागिरीची भूमी पावन झाली आहे. रत्नागिरीकरांनी आज रिंगण आणि पंढरी अनुभवली. जातीभेद नष्ट करणे, संतसाहित्याची परंपरा पुढे सुरू ठेवणे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम वारकऱ्यांकडून होत आहे. वारकरी संप्रदायाला राजाश्रय मिळाला पाहिजे. संप्रदायाच्या महंतांशी चर्चा करून लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. तुमची भूमिका निश्चितच राज्याकडे मांडू, त्यात कुठेही मागे पडणार नाही. संमेलनाचे अध्यक्ष माधव महाराज शिवणीकर म्हणाले, वारकरी संप्रदायाचा विचार ज्याने ज्याने घेतला तो जगात नावारूपाला आला.
ते विचार जपले पाहिजेत, भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-बापांची सेवा मुलांनी केली पाहिजे. हा संस्कार अशा संमेलनातून देऊन निरोगी समाजमन बनण्यास उपयुक्त ठरेल. पांडुरंग महाराज राशिनकर यांच्या हस्ते हभप माधव महाराज शिवणीकर यांच्याकडे वीणा प्रदान करण्यात आली. प्रास्ताविकात विठ्ठल पाटील काकाजी यांनी सविस्तर आढावा घेताना या मानवतावादी परंपरेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे सांगितले. पसायदानाने संमेलन उद्घाटनसत्राचा समारोप करण्यात आला.