‘रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा नाही, तर चर्चा सुरू आहे. कोणाला दुखवायचे नाही, परंतु आम्ही देखील पाच तासांत हजारो कार्यकर्ते गोळा करून मेळावा घेतला. प्रचार सुरू झाला तर आमचीही ताकद काय ते दिसेल. उमेदवारी मागताना पक्षांमध्ये कटुता येणार नाही, याची जबाबदारी दोन्ही पक्षांची स्वीकारली पाहिजे. आमचाही या जागेवर दावा कायम असून, उमेदवार धनुष्यबाणाचा म्हणजेच महायुतीचा असेल,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. गुढी पाडव्यानिमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये श्री देव भैरीची पालखी खांद्यावर घेऊन सामील झाले. त्यानंतर पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, “गुढी पाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद कायम राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. खरं तर आज मी काही राजकीय बोलणार नव्हतो, परंतु तुम्ही प्रश्नच विचारलेत त्याला उत्तर देतो. पुढच्या गुढीपाडव्याला आपण एकत्र जमू, तेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील.” महाविकास आघाडीबाबत सांगलीमध्येच नाही, तर संपूर्ण देशातच संभ्रम आहे. जे निवडूनच येणार नाहीत, त्यामुळे त्यांनी आश्वासन द्यायला काय हरकत आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार ज्यांच्याकडे नाही, त्यांनी निवडून येण्याच्या गप्पा मारू नये. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा तिढा येत्या २ ते ३ दिवसांत संपेल.
शिवसेनेचाही या जागेवर दावा कायम आहे, मात्र महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल. या जागेवरील उमेदवार धनुष्यबाणाचाच असेल. कुणाला दुखवायचे नाही, भाजपने आपला दावा केला आहे. आम्ही आमचा दावा करत आहोत. किरण सामंत यांच्या उमेदवारीवरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहेत. या त्यांच्या चाहत्यांच्या प्रामाणिक भावना आहेत. दोन्ही पक्ष आपली भूमिका बजावत आहेत. शेवटी उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पावर घेणार आहेत.
…परतायचे की नाही तो खडसेंचा प्रश्न – एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. त्याबाबत काही चर्चा सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांच्या भेटी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्ये त्यांनी परत यायचे की नाही, हा एकनाथ खडसेंचा प्रश्न आहे, असे उदय सामंत म्हणाले.