केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारकडून भांडवलदारांचे हित पाहिले जात आहे. संगमेश्वरातील सह्याद्री पट्ट्यातील शेकडो एकर जमीन अदानी ग्रुपच्या घशात घातली जात आहे. मृत्यू पावलेल्या जमीन मालकांना त्यासाठी जिवंत करण्यात आले. परंतु मी कोकणची भूमी कोणाच्याही घशात जावू देणार नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीच्या शहर मेळाव्यात केले. शुक्रवारी महाविकास आघाडीच्या रत्नागिरी शहराचा मेळावा मराठा भवन हॉल येथे पार पडला.
या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, अभिजित हेगशेट्ये, सौ. नेहा माने, राजेंद्र महाडिक, निलेश भोसले यांच्यासह आप व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा भवन येथे शिवसेना- इंडिया आघाडीचा शहर मेळावा झाला. गुरूवारी आयत्यावेळी शहराच्या मेळाव्याचे आयोजन करून तो शुक्रवारी यशस्वी करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी भाजपा उमेदवार नारायण राणे यांच्यावर सडकून टिका केली.
भाजपाने आतापर्यंत हिंदू, मुस्लिम तेढ निर्माण करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर मराठा, कुणबी समाजाला झुंजवले. जे काही देशाचा विकास झाल्याचे दाखवले जात आहे ती केवळ थापेबाज़ी आहे. प्रत्यक्षात देशाला गरीबीच्या खड्ड्यात लोटले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार खा. राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा अभिमान असल्याचे म्हटले.
राहुल गांधींची भाजपचे नेते चेष्टा करत असले तरी देशाची एकसंघता, घटना आणि लोकशाही टीकवण्यासाठी या यात्रेचा उपयोग झाल्यानेच अभिमान असल्याचे ते म्हणाले. तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, आपचे परेश साळवी, ज्योतीप्रभा पाटील, काँग्रेसचे अॅड. अश्विनी आगाशे, दीपक राऊत आदींनी आपले विचार मांडले.